मोटारसायकल चोरट्याला बेड्या; दोन गुन्हे उघडकीस

<p>मोटारसायकल चोरट्याला बेड्या; दोन गुन्हे उघडकीस</p>

 

कोल्हापूर : शहर व परिसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी जोरदार कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केलीय. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आलेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमेश धोंडीबा गायकवाड (वय २६,मूळ रा. साळोखे पार्क, राजेंद्रनगर, कोल्हापूर तर सध्या रा. यादव नगर, राजारामपुरी, कोल्हापूर) असे आहे.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटारसायकल चोरी प्रकरणांचा तपास सुरू केला होता. पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. गोपनीय माहितीच्या आधारे १३ एप्रिल रोजी कोल्हापूर-भुदरगड मार्गावरील सोंगड्या हॉटेल परिसरात सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीने भुदरगड आणि सांगली शहर पोलीस मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलीसांनी आरोपीकडून हिरो होंडा सीडी डॉन (MH-09-AR-6773) आणि हिरो होंडा CD 100 SS (MH-10-M-8560) या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, तसेच पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं पोलीस कर्मचारी संदीप पाटील, वसंत पिंगळे, विनोद चौगुले, अनिकेत मोरे, सचिन जाधव, महेश आंबी, संजय हुंबे, सतीश सूर्यवंशी आणि अरुण धनगर यांनी केली.