‘देवाभाऊ काय चाललंय तुमचं’  : राजू शेट्टींचा शक्तीपीठ महामार्गावरून मुख्यमंत्र्यांना सवाल

<p>‘देवाभाऊ काय चाललंय तुमचं’  : राजू शेट्टींचा शक्तीपीठ महामार्गावरून मुख्यमंत्र्यांना सवाल</p>

कोल्हापूर – शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत आहे. हा पैसा जनतेच्या खिशातून खर्च केला जात असल्याचे म्हणत माजी खासदार राजू शेट्टी यांनी, ‘देवाभाऊ काय चाललंय तुमचं’  असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. 

राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे कि, “देवाभाऊ काय चाललंय तुमचं...फोंड्या माळावर तुम्हाला १ किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४.५४ कोटी रूपये कशासाठी लागतात ?  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीस ८०२ किलोमीटर लांबीचा ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग जाहीर केला. संपुर्ण राज्यातील या महामार्गाचा १ किलोमीटरचा खर्च १०७ कोटी २३ लाख रूपये होता. 
आता देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग माण- खटाव मार्गे वाढवून तो ८५६.९४ किलोमीटर म्हणजेच ५४.९४ किलोमीटर इतके अंतर वाढवून आता या महामार्गाचा खर्च १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचवला आहे. याचाच अर्थ ५४.९४ किलोमीटर रस्त्यासाठी १४ हजार कोटी रूपयांनी जादा प्रकल्प खर्च वाढला. थोडक्यात माण - खटाव या माळरानावरून जाणा-या रस्त्याच्या १ किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल २५४.५४ कोटी रूपये इतका खर्च केला जाणार आहे.

देवाभाऊ फोंड्या माळावर तुम्ही १ किलोमीटर रस्त्यासाठी २५४.५४ कोटी रूपये खर्च करत आहात नेमका हा महामार्ग ट्रम्प तात्यांचा डॉलर रस्त्यावर टाकून महामार्ग बनविणार आहात काय ?  तुमची भ्रष्ट्राचारी महत्वाकांक्षा इतकी वाढली आहे की या प्रकल्पातून ७० हजार कोटी रूपयाचा ढपला पाडण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहात. कारण हा सारा पैसा जनतेने व्याजासहित टोल रूपाने परत करायचा आहे.”

दरम्यान, या टीकेमुळे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला असून यावर सरकारकडून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.