कोल्हापुरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; २ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण अटकेत..
कोल्हापूर : जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका व्यक्तीस अटक केली असून सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गगनबावडा तालुक्यातील निवडे गावात अमोल अरुण माने (वय ४१) हा आपल्या पानटपरीत तसेच राहत्या घरी देशी व विदेशी दारूचा साठा करून बेकायदेशीर विक्री करत होता. या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी दुकान व घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत एकूण २,००,०६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.