इचलकरंजीत पीएम ई-बस सेवेचा शुभारंभ…

३० सप्टेंबरपर्यंत मोफत प्रवासाची घोषणा

इचलकरंजी – केंद्र सरकारच्या पीएम ई-बस योजनेअंतर्गत इचलकरंजीला २५ ई-बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ई-बस सेवेचा आज शहरात अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्याला खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, परिवहन सभापती अरुणा बचाटे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर खासदार, आमदार, नगरसेवक, सभापती आणि महापालिका प्रशासनातील पदाधिकाऱ्यांनी ई-बस मधून प्रवास केला.

यावेळी ई-बस चार्जिंग स्टेशनचेही मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. शुभारंभानंतर पहिली ई-बस श्रीक्षेत्र नरसिंहवाडीच्या दिशेने रवाना झाली. इचलकरंजी शहराच्या सुमारे २० किलोमीटर परिसरात ई-बस सेवा उपलब्ध होणार आहे. शहरातील विविध मार्गावर एकूण २५ ई-बसेस धावणार असल्याने शहरासोबतच परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे  ई-बस सेवेचा नागरिकांना अनुभव घेता यावा, यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत ही सेवा मोफत ठेवण्याची घोषणा आमदार  आवाडे यांनी केली.

वातानुकूलित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक अशी ही ई-बस सेवा इचलकरंजीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा बदल घडवून आणणार असल्याचे मानले जात आहे.

Scroll to Top