राजकीय

९ नोव्हेंबरच्या संघर्ष मोर्चात मुलाबाळांसह, गुराढोरांसह सहभागी होण्याचा निर्धार…

pnigave 3 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर –  महायुती सरकार सत्तेचा दुरुपयोग करून गोकुळमध्ये सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. याविरोधात सोमवारी नऊ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने कोल्हापूरमधील डाव्या चळवळीतील कामगार संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटनांची बैठक शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आज पार पडली. यावेळी उपस्थित पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या जुलमी सत्तेला धडा शिकवण्याची हीच वेळ असून यामध्ये सर्वांनी मुलं बाळं आणि गुराढोरांसह सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

 गोकुळमधील महायुतीच्या संचालकांनी चेअरमन निवड बैठकीला गैरहजर राहून घाणेरडे राजकारण केले. आता पुढच्या बैठकीला सुद्धा ते हजर राहतील का नाही यात शंका आहे. सध्या हे संचालक कुठं आहेत याचा ठाव ठिकाणा नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात वॉरंट काढावे, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना करण्याचा ठराव करण्यात आला. उद्या दुपारी चार वाजता महायुतीच्या संचालकां संदर्भात निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार आहे. तर सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुती सरकारने सहकार कायद्यात बदल करून काढलेल्या अध्यादेशाची होळी करण्यात येणार आहे, असा सुद्धा ठराव करण्यात आला.

यावेळी बोलताना भाई बाबुराव कदम यांनी, हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असून याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे सांगत कोल्हापूरची जनता मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सरकारला धडा शिकवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

शिक्षक नेते भरत रसाळे यांनी, हे सरकार लोकशाही मूल्य पायदळी तुडवण्याचे काम करत आहे. साम, दाम, दंड, भेद कशाचाही वापर करा, पण सत्ता काबीज करा, अशी यांची नीती आहे. याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे आणि हाच आक्रोश सोमवारच्या मोर्चात पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी, राजसत्ता चालवणारेच राज्यघटनेचा गैरवापर करत आहेत. मूलभूत अधिकार संपवण्याचे काम हे सरकार करत आहे जर राज्यघटना टिकवायची असेल तर मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होऊन विरोध दर्शवला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी, महायुतीच्या बारा संचालकांनी आणि महायुती सरकारने सत्तेसाठी हे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे. निवडून दिलेल्या या बारा संचालकांनी दूध उत्पादकांच्या मताचा अनादर केला आहे. याचा जाब त्यांच्या दारात जाऊन विचारला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

रवी जाधव यांनी, महायुतीचे बारा संचालक जाणून बुजून गायब आहेत. तीन सलग बैठकीला हजर न राहिल्यास प्रशासक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ही लढाई जनतेच्या दरबारात घेऊन जाणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

कॉम्रेड दिलीप पवार यांनी, सत्तेसाठी महायुतीने खूपच खालचा स्तर गाठला आहे. या बाराही संचालकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा सरळ सरळ अपमान केला आहे. त्यामुळे आता जनतेनंच यांना धडा शिकवला पाहिजे असे मत व्यक्त केले.

शिवाजीराव परुळेकर यांनी, हा प्रश्न आता फक्त गोकुळ पुरता मर्यादित राहिला नाही. अध्यादेश काढून का सर्वच सहकारी संस्था उद्या गिळंकृत केल्या जातील. साखर कारखाने सुद्धा यातून सुटणार नाहीत. त्यामुळे याचे गांभीर्य ओळखून सर्वानी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला प्राचार्य टी. एस. पाटील, रघुनाथ कांबळे, सीमा पाटील, संपतराव पाटील, कुमार जाधव, बाबुराव पाटील, दिलदार मुजावर, विवेकानंद गोडसे, बाबुराव पाटील, कुमार जाधव, संजय साठे, पंकज खोत यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  

संबंधित विषय

Scroll to Top