कोल्हापूर – सर्व स्तरातून सहकार कायद्यातील नवीन बदलाला विरोध होत असताना राज्य सरकारने गोकुळची सत्ता काबीज करण्याच्या उद्देशाने सहकार कायद्यात केलेल्या बदलाविषयी नुकताच अध्यादेश जारी केला आहे यावर आमदार सतेज पाटील यांनी,घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही..!, अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
आमदार सतेज पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ?चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान…लक्षात ठेवा, कोल्हापूरकर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही, अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !




