शैक्षणिक

चंदगडमधील विद्यार्थ्यांसाठी आता विज्ञानाची फिरती प्रयोगशाळा

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा
गोवा सायन्स सेंटरचा ‘सायन्स ऑन व्हील’ उपक्रम; दहा शाळांमध्ये होणार आयोजन

चंदगड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याची आणि हाताळण्याची संधी मिळावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने गोवा सायन्स सेंटर, पणजी यांच्यावतीने चंदगड तालुक्यात ‘सायन्स ऑन व्हील’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ या कालावधीत तालुक्यातील निवडक दहा शाळांमध्ये हा उपक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक पांडुरंग काकतकर यांनी दिली.

या उपक्रमांतर्गत गोवा सायन्स सेंटरकडून विविध विज्ञान प्रयोगांची मांडणी असलेली विशेष बस तज्ज्ञ मार्गदर्शकांसह चंदगड तालुक्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक शाळेच्या परिसरात ही बस दोन दिवस थांबणार असून, विद्यार्थ्यांना बसमधील विविध प्रयोग प्रत्यक्ष पाहण्यासह ते हाताळण्याची संधी मिळणार आहे. तसेच तज्ज्ञांकडून प्रयोगांचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनही केले जाणार आहे.

विशेष म्हणजे हा संपूर्ण उपक्रम मोफत असून, यासाठी संबंधित शाळांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. पहिल्या टप्प्यात प्रथम नोंदणी करणाऱ्या शाळांमधून दहा उपक्रमशील शाळांची निवड केली जाणार आहे. या उपक्रमाचा लाभ केवळ निवड झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर परिसरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनाही घेता येणार आहे.

इच्छुक शाळांच्या मुख्याध्यापकांनी नोंदणीसाठी gscp.education@gmail.com या ई-मेलवर पत्र पाठवावे. तसेच त्याची प्रत उपक्रम समन्वयक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांना ९४२३५१२४९३ या क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये स्वतंत्र आणि सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांचा अनुभव घेता येत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी पांडुरंग काकतकर यांनी पुढाकार घेतला आहे. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आजवर विविध उपक्रम राबविले आहेत.

पुणे, मुंबई, नागपूर यांसह इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल, कोलकाता, आयआयटी गुवाहाटी, चंदीगड, दिल्ली, हैदराबाद, भोपाळ, तिरुअनंतपुरम आणि बंगळुरू अशा विविध ठिकाणी विज्ञानविषयक उपक्रमांसाठी त्यांची निवड झाली आहे. चंदगडमध्ये शिक्षण घेतलेल्या काकतकर यांनी आपल्या कर्मभूमी सिंधुदुर्गासह ग्रामीण सीमाभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top