आजोबांचे स्वप्न… नातीने केले साकार! तळशीनहाळच्या श्रद्धाची MPSCत राज्यातील मुलींमध्ये अव्वल भरारी; एक्साईज इन्स्पेक्टरपदी निवड

चंदगड – घरची परिस्थिती सामान्य… गाव खेड्यातले… मोठ्या शहरातील महागडे क्लासेस नाहीत… पण डोळ्यांत मात्र मोठे स्वप्न आणि ते पूर्ण करण्याची जिद्द होती. अभ्यासात सातत्य ठेवत स्वतःवर विश्वास कायम ठेवला. अपार मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तडशीनहाळ (ता. चंदगड) येथील श्रद्धा भालचंद्र पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत राज्यातील मुलींमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिची एक्साईज इन्स्पेक्टर अर्थात राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षकपदी निवड झाली आणि एका छोट्याशा गावातील लेकीच्या यशाने संपूर्ण चंदगड तालुक्याचा उर अभिमानाने भरून आला.श्रद्धाच्या यशामागे केवळ अभ्यास आणि मेहनत नाही, तर एका आजोबांचे अधुरे राहिलेले स्वप्नही आहे. श्रद्धाचे आजोबा कै. दत्तू गुंडू पाटील हे सेवानिवृत्त पोलीस पाटील होते. ‘माझी नात प्रशासनातील मोठ्या पदावर अधिकारी व्हावी,’ अशी त्यांची मनापासून इच्छा होती. मात्र, नातीचे हे यश पाहण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. आज श्रद्धाने मिळवलेले यश पाहताना पाटील कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत आहेत. आजोबांचे स्वप्न नातीने प्रत्यक्षात उतरवले आहे.

गावच्या शाळेपासून यशाची सुरुवात…..

तळशीनहाळसारख्या ग्रामीण भागातून श्रद्धाच्या यशाचा प्रवास सुरू झाला. गावातील प्राथमिक विद्यामंदिरात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तुर्केवाडी येथील जनता विद्यालयातून तिने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. हलकर्णी येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयातून अकरावी-बारावीचे शिक्षण झाले. त्यानंतर चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी तिने देवगड येथील एस. एच. केळकर महाविद्यालयाची वाट धरली. येथे रसायनशास्त्र विषयातून एम.एस्सी. पदवी मिळवली. शिक्षणाचा हा प्रवास पूर्ण करतानाच तिच्या मनात स्पर्धा परीक्षेचे स्वप्न आकार घेत होते.

क्लासेसपेक्षा स्वतःच्या जिद्दीवर विश्वास…..

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मोठ्या शहरातील महागडे क्लासेस, सुविधा किंवा मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी यापैकी काहीही श्रद्धाच्या वाट्याला नव्हते. मात्र, स्वतःवरचा विश्वास आणि सातत्याने अभ्यास करण्याची तयारी होती. उपलब्ध साधनांचा योग्य वापर करत तिने अभ्यासाचे नियोजन केले आणि मेहनतीला पर्याय नाही, हे सिद्ध केले. अनेकदा अपयश, अडचणी समोर आल्या तरी तिने ध्येयापासून आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. दिवसेंदिवस अभ्यासात सातत्य ठेवत तिने अखेर MPSCच्या परीक्षेत राज्यातील मुलींमध्ये अव्वल स्थान मिळवले.

वडिलांचे संस्कार, कुटुंबाची साथ….

श्रद्धा ही सेवानिवृत्त पोलीस पाटील भालचंद्र दत्तू पाटील यांची कन्या आहे. शिस्त आणि प्रामाणिकपणाचे संस्कार तिला वडिलांकडून मिळाले. कुटुंबीयांनीही तिच्या ध्येयावर विश्वास ठेवत प्रत्येक टप्प्यावर तिला प्रोत्साहन दिले. श्रद्धाचे बंधू विनायक पाटील हे प्रिन्स काजू फॅक्टरीचे मालक आहेत, तर काका विठ्ठल दत्तू पाटील हे शिनोळी येथील कृषीवल काजू फॅक्टरीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

चंदगडच्या गुणवंत परंपरेत आणखी एक मानाचा तुरा…

चंदगड तालुक्यातील तरुणाई स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत आपली छाप पाडत आहे. नुकतीच कालकुंद्री येथील तेजस्विनी पाटील हिची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर आता तळशीनहाळच्या श्रद्धाने MPSCमध्ये राज्यातील मुलींमध्ये अव्वल स्थान मिळवत चंदगडच्या गुणवंत परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.श्रद्धाचे यश हे केवळ तिच्या कुटुंबाचे यश नाही, तर ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. परिस्थिती कोणतीही असो, गाव कितीही छोटे असो; ध्येय मोठे असेल, जिद्द असेल आणि मेहनतीला सातत्याची जोड असेल तर यशाची शिखरे गाठता येतात, हे श्रद्धाने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

Scroll to Top