पुणे – राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आल्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी काढले आहे.
शासनाच्या दुष्काळग्रस्त निर्णयाचा आधार घेत शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क न घेता त्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत तात्काळ सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.




