करवीर पंचायत समितीत हायव्होल्टेज ड्रामा; महिला कार्यकर्त्या-कर्मचाऱ्यांत वाद, पोलिस ठाण्यात तणाव

<p>करवीर पंचायत समितीत हायव्होल्टेज ड्रामा; महिला कार्यकर्त्या-कर्मचाऱ्यांत वाद, पोलिस ठाण्यात तणाव</p>

कोल्हापूर : करवीर पंचायत समिती कार्यालयात आज दुपारी घडलेल्या वादाच्या घटनेनंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती अधिकार कार्यकर्त्या महिलेने कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचा आरोप केला असून या प्रकरणामुळे लक्ष्मीपूरी ठाण्यात काही काळ मोठी गर्दी झाली होती

मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील संबंधित महिला आपल्या सहकाऱ्यासह करवीर पंचायत समिती कार्यालयात आली होती. स्वच्छ भारत मिशन विभागातील कर्मचारी अनुप पाटील यांना ओळखपत्र आणि उपस्थितीवरून जाब विचारताना दोघांत वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमकीत सुरू झालेला हा वाद पुढे चिघळला आणि महिलेने कर्मचाऱ्याची कॉलर धरत दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर संबंधित महिला थेट लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि उलट कर्मचाऱ्याविरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी तसेच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, संबंधित महिला आणि तिचा सहकारी पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच पोलीस ठाण्याच्या परिसरातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असतानाच पोलीस बंदोबस्तामुळे वातावरण नियंत्रणात ठेवण्यात यश आले. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे सावट पसरले होते. मात्र, सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंचायत समितीतील साध्या वादातून निर्माण झालेल्या या घटनेने प्रशासन आणि कार्यकर्त्यांमधील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.