रंग, कला आणि उत्साहाचा मिलाफ; जिल्हास्तरीय स्पर्धेचा भव्य समारंभ पार पडला

<p>रंग, कला आणि उत्साहाचा मिलाफ; जिल्हास्तरीय स्पर्धेचा भव्य समारंभ पार पडला</p>

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय रंगभरण चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक व पुरस्कार वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता राम गणेश गडकरी सभागृह, सौ. स. म. लोहिया हायस्कूल, पेटाळा येथे हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत उपस्थित होत्या. तसेच उद्योजक संग्राम पाटील, संजय धोरवत, विठ्ठल पाटील, निशिकांत साळवेकर, चित्रकार बबन माने आणि प्रविण वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड होते.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत सुमारे तीन लाख रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष एकनाथ कुंभार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संघटनेचे सचिव नागेश हंकारे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन सहसचिव रमजान मुल्ला यांनी केले. पारितोषिक वितरणाचे निवेदन रितेश माने व दत्तात्रय चौगुले यांनी प्रभावीपणे सादर केले.

यावेळी दत्तात्रय धोंगे, संजय सुतार तसेच तालुकास्तरीय प्रतिनिधी व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.