बोगस डॉक्टर व एजंट अटकेत; गर्भपाताच्या गोळ्या देण्याप्रकरणी संयुक्त कारवाई

<p>बोगस डॉक्टर व एजंट अटकेत; गर्भपाताच्या गोळ्या देण्याप्रकरणी संयुक्त कारवाई</p>

कोल्हापूर : गर्भपातासाठी प्रतिबंधित औषधांची विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टरसह एका एजंटाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि तालुका आरोग्य विभागाच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पन्हाळा तालुक्यातील माजगाव (खोतवाडी) येथे करण्यात आली.

जिल्ह्यात गर्भलिंग चाचणी व स्त्री भ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांच्या पथकासह आरोग्य विभागाशी समन्वय साधून कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेश रामचंद्र खोत (वय २८, रा. माजगाव-खोतवाडी, ता. पन्हाळा) हा कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ‘श्री समर्थ क्लिनिक’ नावाने बोगस दवाखाना चालवत होता व गर्भपातासाठी प्रतिबंधित औषधे देत होता. यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बनावट रुग्ण म्हणून पाठविण्यात आले. खोत याने ३ हजार रुपये घेऊन गर्भपातासाठी औषधे देण्याचे कबूल केले. यानंतर त्याने आपल्या ओळखीतील ऋषीकेश संजय माने (वय २७, रा. अंबाईनगर, हुपरी, ता. हातकणंगले) यास फोन करून औषधे मागवली. काही वेळात माने औषधांचे पाकीट घेऊन आला व ते खोत याला दिले. खोत यांनी ते बनावट रुग्णाला देताच पोलीस व आरोग्य पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान ‘श्री समर्थ क्लिनिक’मधील औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले असून आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल अभिवंत यांनी पंचनामा केला आहे.या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पन्हाळा पोलीस व आरोग्य विभागाचे केली.