ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज…

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

मतमोजणी प्रक्रिया अधिकारी – कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत यशस्वी करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

पुणे – विधान परिषदेसाठी होणाऱ्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया नियुक्त सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत आणि ताणरहित पद्धतीने यशस्वी करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले आहेत.

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. या अनुषंगाने मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले म्हणाल्या, मतदान अधिकारी- कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करण्याचे काम केले आहे. मतमोजणीच्या फेरीदरम्यान शांततेत, चूक होऊ न देता आणि कोणतेही दडपण न घेता काम करावे. व्यवस्थित सर्व नमुने भरून संबंधित पथकाकडे जमा करावेत. नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक तेथे मार्गदर्शन, मदत देण्यात येईल. मतपत्रिका वैध अवैध बाबतचे मुद्दे, आक्षेप योग्यरित्या निकाली काढावेत.

मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक टेबलवरील पथकाने काळजीपूर्वक आणि अचूक काम करावे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. मतमोजणी प्रक्रियेत टेबलवरील पर्यवेक्षक, सहायक, संबंधित अधिकारी आणि माहिती संकलन करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे श्रीमती तेली-उगले यांनी सांगितले.

निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. मतमोजणीच्या दिवशी कोणतीही संदिग्धता राहू नये, यासाठी आवश्यक नियम, सूचना आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करावा, असेही त्या म्हणाले.

संबंधित विषय

Scroll to Top