कोल्हापूर – भारतीय मजदूर संघाचे कोल्हापूर जिल्हा अधिवेशन रुईकर कॉलनी येथे घाटगे पाटील सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला संघाचे महामंत्री किरण मिलगीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मिलगीर यांनी संघटनेच्या १९६५ च्या स्थापनेपासून आतापर्यंत आढावा घेतला. राष्ट्रहित, उद्योगहित, श्रमिकहित या त्रिसूत्री नुसार भारतीय मजदूर संघ काम करत असून कष्टकरी कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली.
जिल्हा सचिव प्रवीण जाधव यांनी, कोल्हापूर शाखेच्या कार्याचा आढावा घेतला अमृत लोहार यांनी, आर्थिक अहवाल सादर केले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील ई.एस.आय. सी रुग्णालयामधील बेडची संख्या वाढवाव्यात, प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात ई.एस.आय.सी रुग्णालय सुरू करण्यात यावे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र आणि कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या अशा सेविकांना आरोग्यविषयक कामाव्यतिरिक्त इतर कामे देण्यात येऊ नयेत. आशा सेविकांचे मातृवंदना, एनसीडी, आरोग्यवर्धिनी आणि आयुष्यमान भारत कार्ड या कामांचे प्रलंबित मानधन तात्काळ देण्यात यावे. आदि ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र एडके, माजी जिल्हाध्यक्ष एस. एम. पाटील, मुकुंद जोशी, बाळासाहेब कांबळे, ज्योती तावरे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.




