चंदगड : चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व दौलत साखर कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडला. कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे संचालक पृथ्वीराज खोराटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सांची खोराटे यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याने सन २०२६-२७ या गळीत हंगामासाठी १० लाख टन ऊस गाळपाचे विक्रमी उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती चेअरमन मानसिंगराव खोराटे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायण पूजेने करण्यात आली. यावेळी वाहतूकदार श्री. सुधाकर पाटील (नेसरी) यांच्या हस्ते बैलगाडीचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक विजय पाटील, सीईओ विजय मराठे, लेबर ऑफिसर अश्रू लाड यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व ऊस वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन मानसिंगराव खोराटे यांनी, अथर्व दौलत साखर कारखाना सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाला असल्याचं सांगितलं. यंदाच्या हंगामात १० लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकरी बांधवांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
दरवर्षी शेतकरी आपल्या शेतातील ऊस अथर्व दौलत साखर कारखान्याला पाठवून सहकार्य करतात. यापुढेही शेतकऱ्यांनी असेच सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी हा कारखान्याच्या प्रगतीचा प्रमुख आधार असून, शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या बळावर कारखान्याची वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देण्याची कारखान्याची भूमिका स्पष्ट करताना खोराटे म्हणाले की, कारखान्याने दरवर्षी रास्त आणि एफआरपीपेक्षा जास्त ऊसदर देण्याची परंपरा जपली आहे. यंदाच्या हंगामातही ही परंपरा कायम ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा शेतकरी बांधवांसमोर दुष्काळाचे सावट असून, पावसाच्या कमतरतेचा परिणाम शेतीसह सर्वच घटकांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः ऊस समविचारी पिकाला पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम अनेक आव्हानांनी भरलेला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या परिस्थितीत शेतकरी, वाहतूकदार, कामगार आणि कारखाना व्यवस्थापन यांनी समन्वयाने काम करून हंगाम यशस्वी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चीफ इंजिनियर सुरेश शिंगटे, प्रोसेस जी.एम. दत्तकुमार रक्ताडे, फायनान्स मॅनेजर सुनील चव्हान, केन जी.एम. चंद्रशेखर पाच्यापुरे , मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, सिव्हील इंजिनिअर मुकुंद पाटील, डीस्टीलरी इन्चार्ज अप्पाजी पाटील, स्टोअर कीपर विजयकुमार देसाई, केनयार्ड सुपरवायझर पांडुरंग सरवदे, प्रशासकीय अधिकारी गणेश फाटक यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व ऊस वाहतूकदार उपस्थित होते.




