कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन – तीन महिन्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे एकमेकांशी अनेक वर्षे वैरत्व असताना गोकुळ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नेते महायुतीच्या मांडवाखाली एकत्र आले आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्वसामान्य दूध उत्पादकांमधून उमेदवार उभे करून मोठे आव्हान निर्माण केले आहे. गोकुळ निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून आपल्याकडे साडेचार हजार ठराव धारक असल्याचा दावा करण्यात येत आहे तर गेली दीड महिना आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात फिरून मतदारांशी थेट संवाद साधत उत्पादकांच्या हितासाठी समविचारी आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
मतदानासाठी चार दिवस राहिले असताना साडेचार हजार ठराव आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर आता मतदारांना सहलीवर नेण्याची नामुष्की ओढवली आहे. आज कळंब्यातील एका हॉलमध्ये महायुतीच्यावतीने करवीर तालुक्यातील मतदारांना एकत्र करण्यात आले होते. याठिकाणी जेवणावळ घालून
विजापुरातील एका महाराजाच्या उपस्थितीत आणि एका शिंदे सेनेच्या आमदाराच्या उपस्थितीत मतदारांना सहलीवर पाठवण्यात आले. ऐन नवरात्रात सहलीवर जाण्यासाठी मतदार नकार देऊ लागल्यानंतर त्यांना सहलीवर पाठवून देण्याची जबाबदारी स्थानिक गाव पुढाऱ्यांवर निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे पुढारी आपआपल्या मतदारांना विनवणी करुन सहलीसाठी घेऊन येत असल्याचे दिसून आले. महायुतीच्या नेत्यांकडून मतदारांवर सातत्याने अविश्वास दाखवण्यात येत आहे. कालच्या बैठकीत शपथा घेण्यावरुन नेत्यांमध्ये वाद झाला होता. आज विजापूरच्या एका महराजाच्या उपस्थितीत मतदारांकडून आणा भाका घेऊन सहलीवर पाठवण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी उशिरापर्यंत मतदारांना सहलीवर पाठवण्याचे काम सुरू होते.




