कोल्हापूर – गोकुळच्या निवडणुकीसाठी समविचारी आघाडीने मागितलेले चिन्ह दिले जाऊ नये. यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप आ. सतेज पाटील यांनी करत मुख्यमंत्र्यांना आता या राज्यात दुसरे काही काम नाही का ? असा सवाल उपस्थित केला आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचारासाठी आज कणेरीवाडीमध्ये कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील ठराव धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघा मधील १६५ पैकी १३७ ठराव धारकांनी समविचारी आघाडीला पाठिंबा दिला. यावेळी दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी, गोकुळ दूध संघाची निवडणूक ही साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काची आणि न्यायाची लढाई आहे. त्यामुळे एकशे सदतीस ठरावधारकांनी आघाडीच्या सर्व २५ उमेदवारांना एक टाक मतदान करणे गरजेचे असून कोणत्याही उमेदवाराचा विश्वासघात करु नका, असे आवाहन केले. मल्टी टेस्ट च्या लढ्यात आपण ताकदीने उतरलो म्हणूनच आज ठरावधारकांना मताचा अधिकार मिळाला आहे. आता विरोधकांच्या पेढ्यांच्या पाकिटांना किंवा भूलथापांना बळी न पडता दक्षिण मतदारसंघाचा किल्ला अभेद्य ठेवून आपल्या पॅनेलच्या सर्व २५ उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.




