गोकुळ निवडणुकीची छाननी पूर्ण; दाखल केलेल्या ३०० उमेदवारी अर्जापैकी २४० अर्ज वैध तर ६० अवैध

कोल्हापूर – जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ च्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ३०१ उमेदवारांनी तब्बल ४३६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या सर्व अर्जाची आज संपूर्ण छाननी प्रक्रिया पार पडली.

 कसबा बावड्यातील रमणमळा येथे आज सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. सुरुवातीला सर्वसाधारण गटातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. त्यानंतर महिला राखीव, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. सुरूवातीला मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या जातील, अशी चर्चा होत होती. मात्र, कोणत्याही उमेदवाराने व्यक्तिगत पातळीवर कोणा विरोधातही हरकत घेतली नाही. मात्र, गोकुळ संघाच्या उपविधी आणि न्यायालयीन प्रक्रियेनुसार अर्जाची प्रशासकीय छाननी करण्यात आली. ज्या संस्थेच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय त्या संस्थेने गेल्या तीन वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १० टन पशुखाद्याची खरेदी केलेली असणे, तसेच दरवर्षी ४० हजार लिटर दूध संकलन केलेले असणे, हे आणि अन्य निकष पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी दाखल अर्जापैकी छाननीनंतर २४० अर्ज वैध, तर ६० अर्ज अवैध ठरल्याचे आज जाहीर केले. सर्वसाधारण गटातील १६२ अर्जापैकी १४६ अर्ज वैध, तर १६ अर्ज अवैध आणि महिला राखीव गटातील ६० अर्जापैकी ३४ अर्ज वैध, तर २६ अर्ज अवैध ठरले. इतर मागास प्रवर्गातील ४७ अर्जापैकी ३७ अर्ज वैध, तर १० अर्ज अवैध आणि अनुसूचित जाती-जमाती गटातील १३ अर्जापैकी ९ अर्ज वैध, तर ४ अर्ज अवैध ठरले तर विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील १८ अर्जापैकी १४ अर्ज वैध, तर ४ अर्ज अवैध ठरले.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Scroll to Top