संत बाळूमामा देवस्थान जमीन गैरव्यवहार : पाच जणांना अटक ; दोन मुख्य संशयित पसार

कोल्हापूर –  मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत संत बाळूमामा देवस्थान समितीमध्ये झालेल्या तब्बल ६० कोटी ७५ लाख रुपयांच्या कथित अपहाराचा तपास एसआयटीकडून सुरु आहे. याच तपासादरम्यान देवस्थानच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारात ११ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

देवस्थान परिसरात पार्किंगसाठी जागेची आवश्यकता असल्यामुळे काही स्थानिकांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या. मात्र,  या जमिनी देवस्थानला विकण्यापूर्वी काही एजंटांनी त्या मूळ मालकांकडून कमी दरात खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एजंटांनी या जमीनी देवस्थानला कोट्यवधी रुपयांना विकून मोठा आर्थिक फायदा मिळवल्याचा संशय आहे.

गेल्या महिनाभरात एसआयटीने जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये नावे निष्पन्न झालेल्या मुरगूड मधील डॉ. भीष्म जोतीराम सूर्यवंशी पाटील, सागर महादेव शिंदे, प्रकाश पांडूरंग मांगले, निढोरी मधील रणजीतसिंह सुरेशराव सूर्यवंशी, आदमापूर मधील तन्मय दत्तात्रय बाचणकर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार तुकाराम माने, अजित मुजुमदार, संतोष पाटील, हौसिंग पाटील आणि रवींद्र पाटील यांच्या पथकाने मुरगूड आणि निढोरी परिसरातून पाचही संशयितांना अटक केली आहे. एसआयटीकडून पुढील तपास सुरु आहे.

Scroll to Top