कोल्हापूर – गोकुळ दूध संघामार्फत गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘दूध वाढ गुणवत्ता सुधारणा’ कार्यक्रमाला सुधारित कार्यपद्धतीमुळे अधिक गतिमान आणि कृतिशील स्वरूप देण्यात आले आहे. या सुधारित कार्यपद्धतीच्या एस.ओ.पी. पुस्तिकेचे आज गोकुळ दूध संघाचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे व प्रशासकीय मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते संकलन विभागातील अधिकाऱ्यांकडे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २४५ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक गावातील पाच याप्रमाणे १ हजार २२५ दूध संस्थांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. गोठा व्यवस्थापन सुधारणा आणि दूध व्यवसाय सुधारणा या दोन पातळ्यांवर काम केले जाणार आहे. प्रत्येक गावातील २० याप्रमाणे सुमारे ४ हजार ९०० म्हैस दूध उत्पादकांची निवड केली आहे. तसेच त्यांच्या पती-पत्नींना गोठा व्यवस्थापन, पशुआरोग्य, वैरण, पशुखाद्य व दूध उत्पादन वाढीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. संबंधित गावातील सर्व दूध संस्था व उत्पादकांमध्ये दूध व्यवसाय सुधारणा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, आहार संतुलन, पशुखाद्य, कृत्रिम रेतन, आर.बी.पी. व महिला नेतृत्व विभागांच्या समन्वयातून जंतनिर्मूलन, लसीकरण, सी.एम.टी. तपासणी, वंध्यत्व निवारण, गोचीड नियंत्रण, सायलेज, सुधारित वैरण, संतुलित आहार आणि स्वच्छ दूध निर्मितीवर भर दिला जाणार आहे. शासनाच्या पशुसंवर्धन योजनांचा लाभ तसेच गोकुळच्या विविध सेवा-सुविधा उत्पादकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सहा. महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, दत्तात्रय वाघरे, व्ही.डी.पाटील, धनाजी पाटील, डॉ. दयावर्धन कामत, भरत मोळे, डॉ.एम.पी.पाटील, संभाजी पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


