गोकुळचा कारभार अमूलवर अवलंबून राहता कामा नये, यासाठी आमचा लढा  : आ सतेज पाटील

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील दूध संस्था ठरावधारकांचा मेळावा आज पेठ वडगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. महायुतीच्या अनेक नेत्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकारच उरला नसल्याने ते हतबल झाले आहेत, असा टोला लगावत गेल्या पाच वर्षांत आम्ही अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेत होतो. मात्र आता महायुतीमध्ये निर्णयांसाठी त्यांना मुख्यमंत्र्यांकडेच जावे लागत असल्याचे सांगितले.

महायुतीची ही परिस्थिती पाहता भविष्यात दूध उत्पादकांचे काय होणार, याची मोठी चिंता वाटत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाचा कारभार परप्रांतीय अमूल दूध संघावर अवलंबून राहता कामा नये, हा संघ कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याच हक्काचा आणि मालकीचा राहिला पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

हातकणंगले परिसरातील १६१ पैकी ८१ हून अधिक ठरावधारक आज राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत भक्कमपणे उभे आहेत असे सांगून आमची आघाडी सत्तेवर आल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला अधिक चांगला दर देण्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.

म्हैस खरेदीसाठी अनुदान, मुक्त गोठ्याच्या कंपाउंडसाठी ५०% अनुदान, पशुखाद्याच्या दरात प्रति पोते १०० रुपयांची कपात, कळंबा-गारगोटी मार्गावरील कात्यायनी इथल्या २० एकर जागेत अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्राची उभारणी, गोकुळच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक रुपयामागे ९० पैसे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, प्राथमिक दूध संस्थांच्या इमारती बांधकामासाठी अनुदान, संस्था सचिवांना मानधन आणि जनावरांच्या गोठ्यासाठी २५ हजार रुपयांचे सहाय्य, आदी विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यासाठी समविचारी आघाडीच्या सर्व उमेदवारांना एकमुखी कौल देऊन विजयी करण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

यावेळी हनुमान दूध संस्था अंबपवाडीचे ठरावधारक मधुकर जाधव यांनी दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. गोकुळ संघ टिकला पाहिजे आणि स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी लावलेले हे रोपटे अधिक बहरले पाहिजे, या विचाने आम्ही समविचारी आघाडीला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी संचालक रणजितसिंह पाटील आणि शशिकांत पाटील चुयेकर यांनी, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळचा कारभार अधिक पारदर्शक आणि शेतकरी हिताचा करण्यासाठी आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन सर्व ठरावधारकांना केले.

या मेळाव्याला माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, उपनगराध्यक्ष अभिजीत गायकवाड, भगवानराव जाधव, शशिकांत खवरे, राहुल सावंत, महेश कुंभार, कपिल पाटील, भारत पाटील, राजवर्धन पाटील, ऍड शहाजी पाटील, अभिजीत पाटील, अभिजीत माने, बाळासाहेब माने, अजित पवार धामोडकर, प्रवीण सोनवणे, आदेश राजूबाबा आवळे, बाबासाहेब चौगले, रामराजे कुपेकर, बयाजी शेळके, सचिन घोरपडे, बाबासाहेब देवकर, विकास पाटील, विद्याधर गुरबे, विशाल पाटील, मोहन धुंदरे यांच्यासह विविध दूध संस्थांचे अध्यक्ष, संचालक आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top