सुमारे २ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर – पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे बुधवारी सायंकाळच्या सुमाराला कोडोली ते काखे मार्गावर भोसले मळ्याजवळ कोडोली पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना एक ऑटो रिक्षामधून बेकायदेशीरपणे देशी विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी काखे गावातील रिक्षाचालक भैरवनाथ जनार्दन गायकवाड याला ताब्यात घेत सुमारे सत्तावन्न हजार रुपयांचा मद्यसाठा आणि रिक्षा असा दोन लाख सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोडोली पोलिसांनी आठवडाभरात अवैध दारू विक्री विरोधात दुसरी मोठी कारवाई केली असल्याचे कोडोली पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपाअधीक्षक श्रीकांत ठिकाणे यांनी सांगितले.
अवैध दारू विक्री विरोधात कोडोली पोलिसांनी सुरु केलेल्या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. कोडोली पोलिसांनी बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या मद्य, गुटखा, मावा विक्री विरोधातील कारवाईचे स्थानिकांमधून स्वागत होत आहे.



