कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास व्यावसायिकाचा धारधार शस्त्राने खून करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिरज तालुक्यातील हरिपूर येथील माजी सरपंचाचे पती विकास बाबूराव बोंद्रे (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हत्येची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विकास बोंद्रे हे मित्र महमंद नायकवडी यांच्यासोबत मोटारीतून कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. काम आटोपून ते सायंकाळी हरिपूरकडे येत असताना कोथळी येथे संशयित अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल यांची गाडी त्याच मार्गावर होती. बोंद्रे यांच्या मोटारीमुळे संशयिताच्या गाडीला अडथळा झाल्याचा राग आल्याने त्याने बोंद्रे यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. रिंग रोडवर बोंद्रे यांची गाडी आल्यानंतर संशयिताने गाडी अडवली. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. वाद वाढल्यानंतर संशयिताने बोंद्रे यांच्या गाडीची काच फोडली आणि जवळील हत्याराने त्यांच्या मानेवर वार केला. हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विकास बोंद्रे यांना त्यांचे मित्र महमंद नायकवडी यांनी तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.



