कोल्हापूर – पेठ वडगाव पोलीस ठाण्यासमोरील हॉस्पिटलमध्ये आशिर्वाद मेडिकल आणि आशिर्वाद डिस्ट्रिब्युटर या फर्म कार्यरत आहेत. या फर्मच्या कामकाजासाठी संशयितांची फार्मासिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. औषधांची खरेदी-विक्री, आर्थिक व्यवहारांचा ताळमेळ ठेवणे, बँकेचे व्यवहार, वार्षिक ऑडिट, जीएसटी भरणे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देणे, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे विश्वासाने सोपविण्यात आल्या होत्या.
मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत संशयितांनी आर्थिक व्यवहारांमध्ये कथित गैरव्यवहार करून एकूण १ कोटी ८६ लाख रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२२ ते मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी १९ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरख चौधर करत आहेत.




