मुंबई – गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या निकालाकडे राज्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना न्यायालयाकडून तारीख पे तारीख मिळत आहे. परंतु सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. यावर बोलताना खा. संजय राऊतांनी निकालाची अंतिम तारीखच सांगितली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
“वकील कपिल सिब्बल आणखी एक दिवस युक्तिवाद करतील. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय हा खटला ‘क्लोज फॉर ऑर्डर’ या स्टेजला येऊन साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम निकाल लागू शकतो. त्यामुळे आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत.”, असे वक्तव्य खा. संजय राऊत यांनी केले आहे.
“देशाच्या राजकारणात किंवा या देशाच्या लोकशाहीत काळाकुट्ट अध्याय म्हणून या अध्यायाकडे पाहिलं पाहिजे. या सुनावणी दरम्यान युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी सांगितलं की, अशा पद्धतीने आमदार आणि खासदार फोडून सरकार बनवत राहिलं आणि त्याला निवडणूक आयोगाचं पाठबळ मिळत गेलं, तर या देशातील कोणतंही सरकार स्थिर राहणार नाही.” असे खा. संजय राऊत म्हणाले आहेत.




