कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठी स्क्रीनिंग कमिट्यांची स्थापना केली आहे. या समित्यांमध्ये महाराष्ट्रातील विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज डी. पाटील यांची गोवा राज्याच्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या नियुक्त्यांची घोषणा केली. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी के. जे. जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आली असून, आमदार सतेज पाटील आणि शफी परंबिल यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
शिवाय उत्तर प्रदेशच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी अजय माकन, पंजाबसाठी सचिन सावंत, उत्तराखंडसाठी दीप दासमुन्शी, तर मणिपूरसाठी बी. एम. संदीप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्क्रीनिंग कमिट्यांमध्ये संबंधित राज्यांचे काँग्रेस प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संबंधित सचिव हे पदसिद्ध सदस्य असणार आहेत.
आमदार सतेज पाटील यांच्यावर गोवा विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या राजकीय कार्यक्षेत्राचा विस्तार झाल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्राबाहेरही काँग्रेस संघटनेत त्यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




