ब्रेकिंग न्यूज
Blog

दाजीपूरच्या जंगलात वन्यजीवांसाठी जलसंजीवनी…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – उन्हाची तीव्रता वाढत असताना जंगलातील पाणवठे आटू लागल्यास वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेतात. यातून वन्यजीव आणि मानव यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, जंगलातच पाण्याची उपलब्धता करून दिल्याने वन्यप्राण्यांचा नागरी वस्त्यांमधील वावर कमी होऊन मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलातच पाण्याची शाश्वत व्यवस्था करण्याचा संवेदनशील उपक्रम हाती घेतला आहे.

 अभयारण्यात अस्तित्वात असलेल्या सर्व पानवट्यांची स्वच्छता करून त्यामध्ये नव्याने पाणी भरण्यात आले. तसेच नैसर्गिक ओढे आणि झऱ्यांवर ठिकठिकाणी बंधारे घालून वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले, वन्यजीव सप्ताहाच्या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला आता वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अधिक व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांसाठी केवळ पाणी उपलब्ध करून देणे नव्हे, तर जंगलातील नैसर्गिक जलस्रोत जपण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे वन्यप्राण्यांना जंगल सोडून पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. वनविभागाच्या या उपक्रमातून जंगल वाचले तर वन्यजीव वाचतील आणि वन्यजीव वाचले तर निसर्गाचा समतोल टिकेल’, असा संदेश अधोरेखित होत आहे.

या उपक्रमासाठी विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांचे मार्गदर्शन लाभले. वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक आणि हंगामी वनमजुरांनी या कामात सक्रिय सहभाग घेतला.

संबंधित विषय

Scroll to Top