कोल्हापूर – हातकणंगले येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज परिसरात असलेल्या जगन्नाथ नगरी यांच्या मालकीच्या सुतळी कारखान्याला मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली. प्लास्टिक वेस्टेजपासून सुतळी तयार करणाऱ्या या कारखान्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि तयार माल असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेसह इतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आठ गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने अग्निशमन दलासमोर आग विझवण्याचे मोठे आव्हान होते.. अखेर तब्बल १२ तासांच्या अथक परिश्रमानंतर आज सकाळी ९ च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या भीषण आगीत कारखान्यातील कच्चा माल आणि तयार सुतळी मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला असून आर्थिक नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.




