नवी दिल्ली – मध्यप्रदेशातील दुचास्कीवाराला ट्रकने धडक दिल्याने त्याच्या उजव्या पायाला पन्नास टक्के कायम स्वरूपी अपंगत्व आले होते. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने त्यांना २ लाख ३३ हजार १३० रुपये नुकसान भरपाई मंजूर केली होती. त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने कोणत्या घटकासाठी किती भरपाई वाढवली, याचा स्वतंत्र विचार न करता सरसकट २ लाख रुपयांची वाढ केली होती. या निर्णयात हस्तक्षेप करत सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय खर्च, उपचारा दरम्यानच्या उत्पन्नाचे नुकसान, भविष्यातील उत्पन्नाचे नुकसान, वेदना आणि शारीरिक त्रास अशा प्रत्येक घटकांचे स्वतंत्र मूल्यमापन करत संबंधित व्यक्तीचे मासिक उत्पन्न ५ हजार २७० रुपये गृहीत धरून आणि वयाच्या आधारे १७ चा गुणक लागू करत न्यायालयाने एकूण नुकसानभरपाई ११ लाख ७५ हजार १०६ रुपये निश्चित केली. यावर ७ टक्के वार्षिक व्याज देण्याचे आदेशही न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती अतुल एस. चांदूरकर यांच्या खंडपीठाने दिले आहे.


