न्यायालय

देशातील कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे… जिल्हाधिकाऱ्यांना ड्रोन सर्वेक्षणाचे निर्देश

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – भारताने आर्थिक आणि अन्य क्षेत्रात मोठी प्रगती केली असली, तरी स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत अपेक्षित कामगिरी होत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वच्छतेतील अपयशामुळे देशाने इतर क्षेत्रांत मिळवलेले यशही निष्प्रभ ठरत असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारी यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोन सर्वेक्षण आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन केंद्रांची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नियम २०२६ ची देशभर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने देशातील कचरा व्यवस्थापनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना सुमारे ४०० जिल्ह्यांमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी विशेष कक्ष स्थापन झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच २८ राज्यांपैकी केवळ ९ राज्यांनी शहरी कचरा व्यवस्थापनासंदर्भातील उपविधींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यावर न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारी यांच्या खंडपीठाने १७ नोव्हेंबर रोजी सुनावणी दरम्यान स्वच्छतेतील अपयशामुळे देशाने इतर क्षेत्रांत मिळवलेले यशही निष्प्रभ ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोन सर्वेक्षण आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन केंद्रांची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यांच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन सुविधांची जिओटॅगिंग आणि वेळ नोंद असलेली छायाचित्रे मागवावीत. तसेच १ जानेवारी २०२७ पर्यंत झालेल्या प्रगतीचा अहवालही सादर करावा, असे न्यायालयाने सांगितले. आर्थिक अडचणींचे कारण देऊन नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या जबाबदारीतून पळ काढता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. रेल्वे स्थानकांवरील कचरा व्यवस्थापनाबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जानेवारी २०२७ ला होणार आहे.

संबंधित विषय

Scroll to Top