कोल्हापूर महापालिकेचे वृक्षारोपण कागदावरच : अॅड वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा आरोप
कोल्हापूर – महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम १९७५ अंतर्गत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांवर शहरात वृक्षारोपण करणे, त्यांचे संगोपन करणे आणि पर्यावरण रक्षण करणे, हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक महानगरपालिकेला आपल्या कार्यक्षेत्रातील वृक्षांच्या जतनासाठी ‘वृक्ष प्राधिकरण’ स्थापन करून नागरिकांकडून वसूल केला जाणारा ‘वृक्ष उपकर’ हा याच कामासाठी वापरणे बंधनकारक आहे. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अनेक ठिकाणी प्रत्यक्षात कोणतीही झाडे न लावता केवळ कागदोपत्री आकड्यांचा खेळ करून प्रत्यक्षात झाडे लावलीच नसल्याची माहिती हिंदू विधीज्ञ परिषदेच्या सदस्यांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत समोर आली आहे.
माहितीच्या अधिकारात प्रत्येक वर्षीच्या आकडेवारीत तफावत आहे. महानगरपालिकेने माहिती अधिकाराच्या अंतर्गत दिलेल्या माहितीत परस्पर विरोधी आकडेवारी दिली आहे. ३१ जुलै २०२६ रोजी दिलेल्या माहितीत ३ हजार १४० झाडे लावल्याचे म्हटले आहे, तर २४ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या दुसऱ्या माहितीत हा आकडा ५ हजार ५९० असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही माहितीत तब्बल २ हजार ४५० झाडांचा फरक आहे. वर्ष २०२५ मधील आकडेवारीही अत्यंत संशयास्पद आहे. महापालिकेने २०२४ मध्ये शिवाजी विद्यापीठ परिसरात ७०० झाडे लावल्याचा दावा केलाय मात्र या संदर्भात शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या माहितीमध्ये महापालिकेकडून त्यांना एकही वृक्ष प्राप्त झाले नसल्याचे सांगितले आहे. एकंदरीत महापालिकेच्या वृक्षारोपणात मोठा घोटाळा झालाय, असा आरोप हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार बैठकीत केला आहे.
महापालिकेकडील वृक्ष लागवडी संदर्भातील नोंदींचा एकमेकांशी ताळमेळ बसत नाही, तसेच प्रत्यक्ष भेटींमधून झाडे अस्तित्वात नसल्याचेही स्पष्ट झाले आहे, असा आरोप देखील अॅडव्होकेट इचलकरंजीकर यांनी केला आहे. यावेळी हिंदू विधीज्ञ परिषदेचे कार्यकर्ते बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.




