कोल्हापूर – शहरात शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी तब्बल २२०० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आणि तालीम संस्थांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकी दरम्यान मंडळांकडून आलेल्या तक्रारी सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीने आज माध्यमांसमोर मांडल्या.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीचा प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय साधण्याचा उद्देश होता. यासाठी पोलीस प्रशासन, खासदार, आमदार, महापौर, आयुक्त तसेच अन्य लोकप्रतिनिधींसोबत बैठका घेण्यात आल्या. मात्र, या बैठकांमध्ये ठरलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही आणि विसर्जन मिरवणुकीपूर्वी महासमितीला विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप महासमितीचे अध्यक्ष गजानन यादव यांनी आज पत्रकार बैठकीत केला.
मंडळाच्या कार्यकर्त्यांना लाठीचार्ज आणि उद्धट वागणूक दिल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांची चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करत समितीच्यावतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी महासमितीचे शिवाजी जाधव, राजेंद्र ठोंबरे, प्रसाद वळंजू, कपिल चव्हाण, शशिकांत बिडकर, अजित सासणे, रामदास काटकर, सदानंद सुर्वे आदी उपस्थित होते.




