ऑलिम्पिकवीर बंडा पाटील म्हणाले, तुमच्यामुळंच मला जीवदान मिळालं…
कोल्हापूर – शाहूवाडी तालुक्यातील रेठरे गांवचे सुपुत्र पैलवान बंडा पाटील रेठरेकर यांनी १९६४ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यांच्या आजाराबद्दल माहिती मिळाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी उपचारांसाठी तात्काळ एक लाखाची मदत दिली.
यासह उपचारासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील, अशी ग्वाही दिली होती. यानुसार ते काही दिवसांपूर्वी डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. आज आमदार सतेज पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आपुलकीनं विचारपूस केली. यावेळी त्यांच्या सोबत डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील यांनी, तुम्हाला काहीही होणार नाही, सगळे व्यवस्थित होईल, तुम्ही शंभरी पार कराल, अशा शब्दांत त्यांना धीर दिला. आमदार सतेज पाटील यांच्या भेटीमुळे भारावून गेलेले पैलवान बंडा पाटील यांनी तुमच्यामुळंच मला जीवनदान मिळाले, अशा शब्दांमध्ये कृतज्ञता व्यक्त केली. या अगोदर सुद्धा आमदार सतेज पाटील यांनी पैलवान बंडा पाटील यांना आधार देत वैद्यकीय उपचारांसाठी मदत केली होती.
या भेटी वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सागर पाटील, अमोल चौगुले यांच्यासह डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि पैलवान बंडा पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.




