कोल्हापूर – कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, संस्कृती अशा विविध क्षेत्रात कोल्हापूरची येणारी पिढी अटकेपार झेंडा रोवतील, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. ते ब्रँड कोल्हापूर पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
कोल्हापुरातील सयाजी हॉटेलच्या मेघमल्हार सभागृहात ब्रँड कोल्हापूर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानीपतकार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वास पाटील यांचा ब्रँड कोल्हापूर समिती सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कोल्हापूरच्या या सुपुत्रांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने ‘ब्रँड कोल्हापूर’ हा सन्मान देण्याचा उपक्रम सात वर्षापासून राबविण्यात येत आहे. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रास्ताविकात ब्रँड कोल्हापूर कमिटीचे सदस्या पत्रकार अनुराधा कदम यांनी ब्रँड कोल्हापूरची सुरुवात ते आता पर्यंतचा प्रवास उलघडला. सदस्य अमर अडके यांनी प्रमुख पाहुण्याची ओळख करून दिली. यानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक रोडमराठाकार डॉ. वसंतराव मोरे आणि ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक डॉ. शरद भुताडिया यांना यंदाचा ब्रँड कोल्हापूरचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर सोनम मस्कर, सदेश सदेश कुरळे आणि चेतन चव्हाण यांना विशेष ब्रँड कोल्हापूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासह स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी विद्यार्थी, कला, क्रीडा, शैक्षणिक, व्यवसाय अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आणि कोल्हापूरचे नाव जगभर पोहोचवणाऱ्या एकूण तीस जणांचा ब्रँड कोल्हापूर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना विश्वास पाटील यांनी, या शाहू नगरीत शंभरवर्षापूर्वी एका मुलीने वाघाशी कुस्ती खेळल्याचा दाखला देत ही भूमी शूरवीरांची असल्याचे नमूद केले. शिवाजी विद्यापीठाचा उल्लेख करत सध्या असलेलं नाव हे योग्य असल्याचे सांगत एकेरी शिवाजी हे काळजातून येतं असं पाटील यांनी नमुद केले. आमदार सतेज पाटील यांनी, कोल्हापूरच्या मातीतील लोकांचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याचा सन्मान स्वकीयांकडून व्हावा, या उद्देशाने ब्रँड कोल्हापूर सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले. आतापर्यंत २६५ जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार अंधारात प्रकाशाचे काम करणार असून नव्या पिढीला दिशा देणार असल्याचा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
पुरस्कार विजेत्यांनी आई-वडील, शिक्षक यांना कधीही विसरू नका जिथं जाल तिथं कोल्हापूर नाव अभिमानाने सांगा असे आवाहन केले. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा यांचा इंडस्ट्रियल कॉरिडॉर करण्याचा मानस आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
पुरस्काराला देताना डॉक्टर वसंतराव मोरे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिली पीएचडी मिळवली याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. बलुचिस्तान हे जगातील एकमेव मराठा राष्ट्र होईल याबद्दल खुलासा केला.
डॉ. शरद भुताडिया यांनी, येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळावी. यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आजवर कलाक्षेत्रात दिलेल्या योगदानाची एक पोचपावती असल्याचे सांगत या पुरस्काराने कोल्हापूरचे नाव आणखीन मोठे होत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जुही धारवाडे यांच्यासह अन्य पुरस्कार विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ संपादक वसंत भोसले, कृष्णात पाटील, पत्रकार चंद्रकांत पाटील, सचिन जवळकोटे, श्रीरंग गायकवाड, प्राचार्य डॉ. महादेव नरके, उदय गायकवाड, प्राचार्य अजेय दळवी, अनंत खासबारदार, भरत दैनी, विनायक पाचलग, संग्राम भालकर, ऐश्वर्या मालगावे, डॉ. राजेंद्र रायकर, सचिन लोंढे-पाटील यांच्यासह सत्कारमूर्तीचे कुटुंबीय, हितचिंतक, नागरिक उपस्थित होते.




