ब्रेकिंग न्यूज
राजकीय

गोकुळचे पडसाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमटणार ?

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

गोकुळ निकालावर आत्मचिंतन करण्यासाठी जिल्हा बँकेत महायुतीच्या नेत्यांची बैठक…

कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या निकालानंतर जिल्हयाचे राजकारण ढवळून निघाले. माजी चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्यासह विश्वास पाटील, अरुण डोंगळे आणि शौमिका महाडिक या दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांची आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बैठक झाली.

 या बैठकीत गोकुळच्या निकालावर चिंतन करण्यात आले. आमदार विनय कोरे यांच्या पन्हाळा, शाहूवाडी मतदारसंघातून शशिकांत खोत यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने याचा फटका नवीद मुश्रीफ यांना बसल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर इतर काही तालुक्यांतूनही मुश्रीफ यांना अपेक्षेप्रमाणे मतदान झाले नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी आजरा कारखान्यावरील कार्यक्रमात आपल्या मुलाला षडयंत्र करून पाडण्यात आल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आज घेतलेल्या केंद्रनिहाय मतदानाच्या आकडेवारीवरून विविध राजकीय चर्चाना सुरुवात झाली आहे. याच मुद्द्द्यांवर बैठकीत चर्चा झाली आणि त्यातून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊन खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. बैठकीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेकडंही सर्वांचे लक्ष लागले होते. बैठकीतून बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव दिसून आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मुश्रीफांनी माध्यमांशी संवाद साधणे टाळले आणि त्यांच्या ऐवजी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना माध्यमांसमोर जाण्यास सांगितले. दरम्यान, गोकुळच्या निकालामुळे धक्का बसल्याची कबुली पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आजच्या बैठकीत आत्मचिंतन करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

या पराभवाची जबाबदारी कुण्या एका नेत्याची नसून आपण सर्वजण त्याला जबाबदार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. मतदारांना महायुतीने घेतलेली भूमिका पसंत पडली नसावी आणि त्यामुळेच असा निकाल लागला असावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या  बैठकीला आमदार विनय कोरे, राजेश पाटील, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, के. पी. पाटील, राहुल पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. गोकुळच्या निकालाचे पडसाद आगामी केडीसीसी बँकेच्या निवडणुकीत उमटणार का ? महायुतीच्या नेत्यांमधील अंतर्गत मतभेद उफाळून येणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित विषय

Scroll to Top