इचलकरंजी – शहरात गणेशोत्सवाच्या काळात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शंभू तीर्थ ते झेंडा चौक या मार्गावर विविध राजकीय पक्षांकडून स्वागत व्यासपीठ उभारले जातात. या व्यासपीठावरून मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांचे स्वागत करून पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला जातो.
मात्र आता राजकीय पक्षांकडून उभारण्यात येणाऱ्या स्वागत व्यासपीठांना चाप बसणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवताना सर्वसामान्य व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांना रस्त्यावर बसण्यासाठी मनाई केली जाते. मग राजकीय पक्षांच्या स्वागत व्यासपीठाच्या अतिक्रमणाला परवानगी का, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी महानगरपालिकेत महापौरांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील वर्षापासून गणेशोत्सवाच्या काळात तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात कुणालाही स्वागत व्यासपीठ उभारण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.




