कोल्हापूर – येत्या रविवारी अकरा ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या, तसेच जुन्या राजवाड्यातील श्री. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत, भक्तांच्या लांब रांगा लागतात. या दोन्ही देवींचे दर्शन भाविकांना सुलभरित्या आणि कमी वेळामध्ये मिळावे, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने योग्य नियोजन लावले जाणार आहे, असे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.
प्रत्येक भाविकाला किमान दोन ते अडीच तासांच्या आतच देवीचे दर्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपी भाविकांची वेगळी नोंदणी केली जाणार आहे. कोल्हापुरातील गणेशोत्सवा प्रमाणच नवरात्रोत्सव देखील सुरळीतपणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून पार पाडण्यासाठी, कोल्हापूर पोलीस दल सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.




