कोल्हापूर – ५२ व्या कोल्हापूर जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेचे एक ते तीन ऑक्टोबर दरम्यान पोलिस मुख्यालयातील क्रीडांगणावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हयातील मुख्यालय, करवीर, शहर, इचलकरंजी-जयसिंगपूर, शाहुवाडी – गडहिंग्लज या विभागातील संघांचा समावेश होता. तीन दिवस अत्यंत चुरशीने या स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत हॉकीमध्ये मुख्यालयाचा पुरूष संघ, फुटबॉलमध्ये शहर विभाग, हँडबॉलमध्ये जयसिंगपूर इचलकरंजी पुरूष विभाग, कबड्डीमध्ये करवीर विभाग, तसेच मुख्यालयाचा महिला संघ, बास्केट बॉलमध्ये जयसिंगपूर – इचलकरंजी पुरूष संघ, तसेच शहर विभागाचा महिला संघ, तर हॉलीबॉलमध्ये मुख्यालयाचा पुरूष आणि शाहूवाडी- गडहिंग्लज विभागातील महिला संघ विजेते ठरले.
ऍथलेटिक्समध्ये शहर विभागातील पुरूषांच्या संघाला चॅम्पियनशिप प्राप्त झाली. बेस्ट ऍथलेटिक्सचा बहुमान मुख्यालयातील निलेश माळी, तसंच सोनाली सानप यांना, तर १०० मीटर पुरुषांच्यात मुख्यालयातील रमेश घुगे यांना प्रथम, तर गोविंद कोळेकर यांना द्वितीय आणि मुलींच्यात वंदना माळवी प्रथम, सागर रेटे यांना द्वितीय क्रमांक मिळाला. रस्सीखेच स्पर्धेत पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचा संघ विजेता ठरला तर विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संघाला दुसरा क्रमांक मिळाला. पोलिस मुख्यालयाच्या विभागाला या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. या सर्वांचा विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते चषक देवून सन्मान करण्यात आला.
खेळातून शारिरीक क्षमता, आणि संघ भावना वाढीस लागते. पोलिसांची शारिरीक, आणि मानसिक कसोटी पाहणार्थी या स्पर्धेतून पोलिसांना आपल्या क्षमता तपासता येतात. धकाधकी आणि ताणतणावाच्या या पोलिस सेवेत शारिरीक तंदुरूस्ती आणि बळ महत्वाचे ठरते. तसेच जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी अधिक सक्षमपणे पार पाडता येत असल्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले. पोलिसांनी खेळाला महत्व देणे गरजेचे आहे. त्यातून ताणतणावातून मात करणे आणि शारिरीक क्षमता वाढवणे शक्य होते. या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड होईल. तिथंही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यास, महाराष्ट्र पातळीवरील पोलिस क्रीडा स्पर्धात कोल्हापूरचे कौशल्य दाखवणे शक्य होईल. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले. शेवटी संचलनाने या स्पर्धेची सांगता झाली.
यावेळी गृह पोलिस उपअधीक्षक राजेंद्र मस्के, करवीरचे उपअधीक्षक आप्पासो पोवार, पोलिस निरीक्षक संजय हिरूगडे, सुशांत चव्हाण, किरण लोंढे, संतोष डोके, श्रीराम कन्हेरकर, विकास जाधव, रवींद्र कळमकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


