इचलकरंजी – शहरात नवव्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप देताना एका गणेश मंडळाची मिरवणूक चांगलीच चर्चेत आली. दत्तनगर परिसरातील छावा गणेशोत्सव मंडळाकडून साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, रात्री दहा वाजल्यानंतरही साऊंड सिस्टीम सुरू असल्याचे गावभाग पोलिसांच्या निदर्शनाला आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मंडळाच्या अध्यक्षासह साऊंड सिस्टीम ऑपरेटरला ताब्यात घेतले तसेच साऊंड सिस्टीम डॉल्बी बंद करण्याचे आदेश दिले.
अध्यक्षाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी गावभाग पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत गणपती विसर्जन मिरवणूकही पोलीस ठाण्याबाहेर आणली. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एक तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर मिरवणूक पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ करण्यात आली.




