कोल्हापूर – कसबा बावड्यात राहणाऱ्या एका विद्यार्थाच्या घरात चोरी झाली आहे. यावेळी विद्यार्थ्याच्या खोलीतून लॅपटॉप, रोकडसह दीड लाखाचा ऐवज लंपास केला आहे.
निपाणीमधील आदित्य संजय नार्वेकर हा कोल्हापुरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो सध्या मराठा कॉलनीतील शिवाजी पुंगावकर यांच्या घरी भाड्याने राहतो. गुरुवारी अज्ञाताने पुंगावकर यांच्या घरातील तिसऱ्या मजल्यावरील विद्यार्थ्याच्या खोलीतील एक लॅपटॉप, रोकड आणि महत्वाची कागदपत्रे असा एक लाख ५३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी आदित्य नार्वेकर याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूपुरी पोलीस परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.




