कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी वारणानगरला जाऊन वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष आ. विनय कोरे यांची भेट घेतली.
देशातील साखर उद्योगासमोर दिवसेंदिवस आव्हाने निर्माण होत असून यामुळे शेतकरी, साखर कारखानदारी आणि कामगार या प्रमुख घटकांना याचा मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी आमदार विनय कोरे यांच्याकडे काही मागण्या सादर केल्या. साखरेचा किमान हमीभाव प्रतिकिलो ५० रूपये आणि इथेनॉलचा प्रतिलिटर ७० रूपये विक्री दर निश्चित करावा, चालू वर्षी गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे रिकव्हरीची घट होवून शेतकरी आणि कारखाने या दोघांचंही नुकसान होणार आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रूपये अनुदान द्यावे, इथेनॉल उत्पादनावर बंदी घातल्याने प्रकल्पांच्या कर्जाच्या व्याजाचा आणि हप्त्याचा भार कारखान्यावर येणार असल्याने संपुर्ण वर्षभराची व्याज सवलत आणि हप्त्याला मुदतवाढ योजना जाहीर करावी, साखरेचा घोटाळा शोधून काढण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी, साखर उद्योगासमोरील संकटाचा विचार करता साखर उद्योग स्थिरावण्यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड, एसडीएफ फंड किंवा एनसीडीसी अंतर्गत खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना वार्षिक ४ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, उसाच्या तोडणी वाहतुकीचे दर वेगवेगळे निश्चीत करण्यात यावेत. या आणि अन्य मागण्यांबाबत माजी खा. राजू शेट्टी आणि आ विनय कोरे यांच्यात चर्चा झाली. चर्चेअंती मागण्यांचे निवेदन आ विनय कोरे यांना देण्यात आले.
या मागण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे अन्यथा पुढील हंगामापासून शेतकरी आणि साखर कारखानदारांना फटका बसून साखर उद्योग कोलमडण्याची शक्यता असल्याचे राजू शेट्टींनी म्हटलंय. या मागण्यांबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा आणि वेळप्रसंगी कारखानदारांनी एकजुटीने संघर्षाची भुमिका घ्यावी. या संघर्षात ऊस उत्पादक शेतकरी आपल्यासोबत राहतील. मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या दबावाला बळी पडून काहीही निर्णय न होताच १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी आणि कारखानदार यांचा संघर्ष अटळ असल्याचा इशारा यावेळी राजू शेट्टींनी दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील, संपर्कप्रमुख अण्णा मगदूम, पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुधीर मगदूम, विजय सावंत, अंकुश पाटील यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.




