कोल्हापूर – शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरमध्ये श्री विठ्ठल मंदिराचा वास्तुशांती आणि कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. कोविडनंतर आता राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट ओढवले आहे. या भीषण दुष्काळातून महाराष्ट्राला लवकरात लवकर मुक्त कर, असे साकडे श्री विठ्ठला चरणी घातल्याचे त्यांनी सांगितले.
मंदिराच्या बाह्य सुशोभीकरणावर आपण कोट्यवधी रुपये खर्च करू शकतो, परंतु मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर मनाला मिळणारी शांतता आणि प्रसन्नता सर्वात महत्त्वाची असते. राजकारण बाजूला ठेवून ग्रामस्थांनी एकत्र येऊन उभारलेले हे विठ्ठल मंदिर अत्यंत देखणे आणि प्रसन्न झाले आहे. या पुण्याईच्या कामात माझा निधी कामी आला, हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना, “आजच्या काळात देवळात जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढतीय, ही आनंदाची बाब असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. मात्र, केवळ दिखावा न करता ‘सत्य हीच खरी धार्मिकता आहे’ हे नव्या पिढीने लक्षात घेतले पाहिजे. देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सत्याच्या मार्गाने चालणे आणि कष्ट करणे आवश्यक आहे. वारीमध्ये ज्याप्रमाणे जात-पात न विचारता केवळ ‘माऊली’ या एका शब्दाने माणसे जोडली जातात, तीच एकता आणि ऋणानुबंध समाजात टिकणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी “सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे भव्य मंदिर उभारले असून या मंदिराच्या उभारणीसाठी आमदार सतेज पाटील यांनी १५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले. दिवंगत माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी धार्मिक कार्याला मदत करण्याची जी परंपरा सुरू केली, तोच वारसा आमदार सतेज पाटील पुढे नेत आहेत. मलकापूरच्या विकासासाठी त्यांचे असेच पाठबळ मिळत राहील, असा विश्वास माजी आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला मलकापूरच्या नगराध्यक्षा रश्मी कोठावळे, काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रविण केसरकर, भाई भारत पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बाबासाहेब देवकर, अमर पाटील, शशिकांत पाटील, संदीप बिरांजे, विकास पाटील, गटनेत्या पल्लवी पोवार, विठ्ठल मंदिर भक्त मंडळ समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुरेश भोगरे यांच्यासह मलकापूरचे नगरसेवक, समितीचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते.




