राजकीय

आ. राजेश क्षीरसागरांच्या आरोपांची चौकशी करा : काँग्रेसच्या नगरसेवकांची मागणी

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

…तर मग आजवर कारवाई का झाली नाही ? : काँग्रेसचा सवाल

कोल्हापूर – महापालिका अधिकाऱ्यांच्या कामकाजावरून आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहे. शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत बोगस कामे, बेकायदेशीर कामे, अंदाजपत्रकात वाढ करून कामे करणे आणि काम न करताच बिले उचलण्यासारख्या गंभीर प्रकारांवर त्यांनी बोट ठेवले होते. इतकंच नव्हे, तर कामकाजात सुधारणा न झाल्यास हक्कभंग आणण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

याच बैठकीत फिरंगाई देवी मंदिराच्या विकासासाठी दोन कोटींच्या निधीच्या अनुषंगाने ना हरकत पत्र दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आमदार क्षीरसागर यांनी केली होती. मात्र, आमदारांच्या याच आक्रमक भूमिकेवर काँग्रेस नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे जर महापालिकेत बोगस कामे, बेकायदेशीर कामे आणि निधीचा गैरवापर होत असल्याची माहिती आमदारांना होती, तर आजवर या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोणती ठोस कारवाई केली ? केवळ पत्रकार बैठकीत अधिकाऱ्यांना इशारे देऊन आणि हक्कभंगाची धमकी देऊन शहरातील प्रश्न सुटणार आहेत का?, असा सवाल काँग्रेसने केला आहे. सन २०२२ पासून मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा दावा केला जात आहे. मग या निधीतून झालेल्या कामांचा दर्जा, खर्च आणि सद्यस्थिती जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची नाही का?,  अधिकाऱ्यांना जाब विचारण्यापूर्वी आतापर्यंत झालेल्या कामांचा हिशेबही जनतेला द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे.

 कोल्हापूरच्या नागरिकांना आरोप-प्रत्यारोप नकोत, तर दर्जेदार रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि पारदर्शक प्रशासन हवं आहे. त्यामुळे आमदारांनी केलेल्या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करावी आणि कारवाईचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे केली आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी आढावा बैठकीत केलेल्या गंभीर आरोपांची प्रशासनाला माहिती द्यावी आणि त्यावर ठोस कारवाई करावी, अन्यथा ही केवळ स्टंटबाजीच म्हणावी लागेल, अशी टीका विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केली आहे. यावेळी काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक सचिन शेंडे, अमर समर्थ, विनय फाळके, माजी नगरसेवक भैया शेटके आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप बिरांजे उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top