कोल्हापूर – गोकुळ दूध संघात सत्ता मिळावी, यासाठी महायुती सरकारने विविध पातळ्यांवर केलेला हस्तक्षेप जगजाहीर आहे. सरकारने चार शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी सहकार कायद्यात बदल केला. हा बदल आता न्यायालयात टिकावा. यासाठी नेमलेल्या वकिलांची तब्बल ऐंशी लाख रुपयांची फी सुध्दा सरकारच्या तिजोरीतून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आ. सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकार आपले पाप झाकण्यासाठी हे उद्योग करतंय, असा आरोप केला आहे.
अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत ‘कोरम’चा विषय येत नाही, हा शब्द केवळ दिशाभूल करण्यासाठी प्रचलित केला गेला. मंत्री चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांनी हे सर्व घडवून आणले असून, या सरकारचा गोकुळमध्ये किती जीव अडकलाय हेच यातून दिसून येत असल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सदस्यांच्या निधी वाटपातील दुजाभावावरुन आ. सतेज पाटील यांनी निधी वाटपात मनमानीच करायची असेल तर जिल्हा नियोजन समिती कशासाठी आहे, असा सवाल उपस्थित केला. शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारची दडपशाही खपवून घेणार नाही, असे सांगत आ. सतेज पाटील यांनी जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा दिला आहे.
कोयना धरणाचे आमचे हक्काचे पाणी अन्यत्र वापरु दिले जाणार नाही असे सुध्दा आ. सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्नांसह सैनिक टाकळीतील प्रस्तावित एमआयडीसी, शक्तीपीठ महामार्ग, मंत्री संजय शिरसाट यांचे वक्तव्य यावर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी लोकांसमोर सत्य मांडावे, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले.
शिवसेनेतील फुटीनंतरच्या घटनाक्रमाबद्दल बोलताना मंत्री संजय शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यावर आ. सतेज पाटील यांनी टोला लगावत दोन हजार एकोणतीसला जनता हे सगळे लक्षात ठेवेल, असे सांगितले.




