आंदोलन

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी कोल्हापुरातील दसरा चौकात एकदिवसीय ठिय्या आंदोलन

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमावासीयांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात आज एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान सीमावासीयांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सीमाप्रश्नावर आता केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष न्याय हवा, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.

यावेळी सीमावासीयांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यात सरकार कमी पडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. कर्नाटक सरकार बेळगावमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन घेऊन सीमाभागावरील आपला दावा मांडत आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही कोल्हापुरात विधिमंडळाचे अधिवेशन घ्यावे आणि सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, सध्या केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्याने सीमाप्रश्न सोडवण्यासाठी संधी आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे प्रभावी पाठपुरावा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणीही करण्यात आली. महाराष्ट्रातील शासन सीमाप्रश्नावर ठाम भूमिका घेत नसल्याची टीका करत, कोल्हापुरातूनच या आंदोलनाची सुरुवात करण्यामागची भूमिका निपाणीचे माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत माने यांनी स्पष्ट केली.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील समन्वयक, जिल्हाधिकारी आणि राजकीय नेत्यांनी एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा, अन्यथा सीमाप्रश्नाचा संघर्ष असाच सुरू राहील, असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिला. सीमाप्रश्नासाठी लढणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्धस्त केले जात असल्याची खंत व्यक्त करत महाराष्ट्र एकीकरण समितीचे लक्ष्मीकांत पाटील यांनी न्यायाची मागणी केली आहे.

आंदोलनात महाराष्ट्र एकीकरण समितीचे निपाणी भाग अध्यक्ष जयराम मिरजकर, बेळगाव शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबासो खांबे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, कादर मलबारी, नंदकुमार कांबळे, अशोक पोळ-पाटील यांच्यासह कोल्हापूर आणि सीमाभागातील अनेक बांधव सहभागी झाले होते.

संबंधित विषय

Scroll to Top