मुंबई – आज निघालेल्या संघर्ष मोर्चाची दखल काँग्रेस पक्षासहकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके आदींनी घेत या संघर्ष मोर्चाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. ज्यात गोकुळ वाचवण्यासाठी लाखो कोल्हापूरकरांनी केलेली अलोट गर्दी दिसत आहे.
काँग्रेस पक्षाने पोस्टमध्ये म्हटले आहे कि, गोकुळ दुध संघासाठी भाजप सरकार विरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रात महायुती सरकारला गोकुळवर सत्ता मिळवायची आहे. गोकुळच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असताना सत्ता मिळवण्यासाठी सरकारने कायदाच बदलला ही मताची चोरी आहे.राज्यातील शेतकरी भाजपला माफ करणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे कि, कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढलेला विराट मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळातही लाखोंच्या संख्येने जनता रस्त्यावर उतरून सरकारच्या चुकीला चूक म्हणत असेल, तर सरकारने हे लक्षात घ्यावे की जनतेच्या मनात अन्यायाविरोधात तीव्र असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आमदार सतेज पाटील यांनी उभारलेल्या या संघर्षात समस्त महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे कि, मुख्यमंत्री दुसऱ्यांना अराजकवादी म्हणतात, पण स्वतः एका दूध संघाची निवडणूक हरल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याऐवजी सत्तेच्या जोरावर ‘होस्टाइल टेकओव्हर’ करण्याचा प्रयत्न करतात. जनतेचा कौल पायदळी तुडवून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करणारेच खरे अराजकवादी आहेत. गोकुळ दूध संघाला या असंवैधानिक आणि अराजक शक्तींच्या तावडीतून वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कोल्हापूरकरांना सलाम..!




