२० नोव्हेंबरला कोल्हापुरात एक दिवसीय धरणे आंदोलन
कोल्हापूर – महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाला सात दशकांहून अधिक काळ उलटला, तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. सीमाभागातील सुमारे पंचवीस लाख मराठी भाषिक अन्यायग्रस्त असल्याचा दावा महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. या प्रश्नासाठी साराबंदी, धरणे, मोर्चे, जेलभरो अशा विविध लोकशाही मार्गांनी आंदोलन करण्यात आले. या लढ्यात शंभरहून अधिक जणांनी हौतात्म्य पत्करले, मात्र अद्याप न्याय मिळालेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाप्रश्नाबाबत उदासीनता सोडून ठोस भूमिका घ्यावी आणि केंद्र सरकारवर दबाव निर्माण करावा, या मागणीसाठी निपाणी, बेळगाव, खानापूर, कारवार, बिदर आणि भालकी या सीमाभागातील मराठी भाषिकांनी येत्या शुक्रवारी २० नोव्हेंबरला दसरा चौकात एक दिवशीय धरणे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि महाराष्ट्रप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी निपाणीचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, जयराम मिरजकर, बेळगाव शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबासो खांबे, नंदकुमार कांबळे, अशोक पोळ पाटील आदी उपस्थित होते.




