राजकीय

शासन नियुक्त सदस्यांच्या चार मतांनी गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील विजयी

pnigave अपडेट: 10 November 2026, 6:02 PM 2 मिनिटे वाचन
शेअर करा
निवडून आलेल्या संचालकांच्या मतदानात समविचारी आघाडीचे शशिकांत पाटील चुयेकर यांना १३, तर राजेश पाटील यांना १२ मते; शासन नियुक्त सदस्यांच्या मतदानामुळे सत्तेचे पारडे फिरले

गोकुळ शिरगाव : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे माजी आमदार राजेश पाटील विजयी झाले. शासननियुक्त चार स्वीकृत सदस्यांच्या मतदानामुळे राजेश पाटील यांचा विजय झाला. मात्र, निवडून आलेल्या संचालकांच्या मतदानात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे शशिकांत पाटील चुयेकर यांनी १३ मते मिळवत बाजी मारली होती. त्यामुळे या निवडणुकीत स्वीकृत सदस्यांची चार मतांनी गोकुळच्या सत्तेचे पारडे महायुतीच्या बाजूने झुकले.


गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव येथील गोकुळ कार्यालय परिसरात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतूनही पोलीस कुमक मागवण्यात आल्याची चर्चा होती. सर्व आवश्यक साहित्यसामग्रीसह पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.


सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अध्यासन अधिकारी मौसमी चौगुले गोकुळ कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर शासननियुक्त चार स्वीकृत सदस्य पोलीस बंदोबस्तात कार्यालयात पोहोचले. पाठोपाठ राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे तेरा संचालक, तर त्यानंतर महायुतीचे बारा संचालक गोकुळ कार्यालयात दाखल झाले. संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये निवडून आलेल्या २५ संचालकांच्या मतदानात समविचारी आघाडीचे शशिकांत पाटील चुयेकर यांना १३, तर महायुतीचे राजेश पाटील यांना १२ मते मिळाली. त्यामुळे निवडून आलेल्या संचालकांच्या मतदानात समविचारी आघाडीने एक मताची आघाडी घेतली. मात्र, शासननियुक्त चार स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. या चारही सदस्यांनी महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या बाजूने मतदान केले. परिणामी, राजेश पाटील यांना विजय मिळाला आणि गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.


या निकालानंतर समविचारी आघाडीने तीव्र आक्षेप घेतला. निवडून आलेल्या संचालकांच्या मतदानात शशिकांत पाटील चुयेकर यांचा विजय झाला होता. मात्र, शासननियुक्त स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार देऊन महायुतीने विजय मिळवला, अशी भूमिका समविचारी आघाडीने मांडली. ‘लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या संचालकांच्या मतदानात आमचा विजय झाला; मात्र स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार देऊन ठोकशाही पद्धतीने महायुतीने विजय मिळवला,’ अशी टीका आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांनी केली


एकूणच, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांच्या १३ विरुद्ध १२ अशा मतांमुळे समविचारी आघाडीचे पारडे जड राहिले; परंतु शासननियुक्त चार स्वीकृत सदस्यांच्या मतांनी महायुतीला सत्तेच्या सिंहासनावर बसवले. आजच्या या प्रकारामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जनतेच्या मनात लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

संबंधित विषय

Scroll to Top