कोल्हापूर – चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सहयोगी आमदार शिवाजी पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष आता गोकुळच्या सत्ताकारणातही चर्चेचा विषय ठरत आहे. गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यात अनेकदा शाब्दिक खटके उडाल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गोकुळमधील घडामोडींवर भाष्य करताना आमदार शिवाजी पाटील यांनी एका नेत्यामुळे जिल्ह्याचे राजकारण बिघडल्याचा आरोप केला. चंदगडच्या आमदारांनी महायुतीला घरचा आहेर दिल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. गोकुळमध्ये झालेला पराभव मान्य करून पुढे जायला हवे होते. मात्र, एका नेत्याने चार शासननियुक्त सदस्यांच्या मतदानाच्या मागणीचा हट्ट धरला आणि सरकारनेही त्याला दुजोरा दिला. ही बाब आपल्याला मान्य नसल्याची स्पष्ट भूमिका आमदार शिवाजी पाटील यांनी मांडली.
या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार राजेश पाटील यांचे नाव पुढे केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आमदार शिवाजी पाटील यांना राजकीय शह देण्यासाठीच ही खेळी केली जात आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. चंदगडमधील राजकीय संघर्षाचा गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत कितपत प्रभाव पडतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




