शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी करीत असलेल्या संघर्षाला आमचा पाठिंबा : खा. सुप्रिया सुळे
मुंबई – गोकुळ दुध संघासाठी आज आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कोल्हापूरकरांची अलोट गर्दी झाली होती. या मोर्चाची दखल खा. शरद पवार यांनी घेतली आहे.
संघर्ष मोर्चाचा लाईव्ह अपडेट घेण्यासाठी खा. शरद पवार हे टीव्ही पाहत असतानाचा व्हिडीओ खा.सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.
खा.सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे कि, ‘गोकुळ’ दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणूक निकालानंतर शासनाने चार सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पण तरीही ही संस्था कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची हा हट्ट अनाकलनीय आहे. या विरोधात कोल्हापूरच्या जनतेने दसरा चौकात जमा होऊन विरोध दर्शवला आहे. या सर्व घडामोडींवर आदरणीय पवार साहेब लक्ष ठेवून असून क्षणाक्षणाची अपडेट घेत आहेत. कोल्हापूरची जनता आणि गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी करीत असलेल्या संघर्षाला आमचा पाठिंबा आहे.




